महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ; खासगी कार पूलिंग सेवेला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता

02 May 2025 15:33:14
 
car pooling
 (Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, वाढता इंधनखर्च आणि प्रदूषण या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार सहप्रवास (कार पूलिंग) सेवेच्या कायदेशीर मान्यतेला मंजुरी देण्यात आली आहे.
 
कार सहप्रवास म्हणजे काय?
कार सहप्रवास म्हणजे एकाच दिशेने जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी एकाच खासगी कारमधून प्रवास करणे. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, इंधनाची बचत होते आणि पर्यावरणावर होणारा भारही कमी होतो. ही सेवा आता नोंदणीकृत संकेतस्थळे किंवा मोबाइल अनुप्रयोगांद्वारे अधिकृतपणे सुरू करता येणार आहे.
 
वाहनचालकांमध्ये नाराजी-
या निर्णयामुळे पारंपरिक सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यांचा आरोप आहे की, अशा प्रकारच्या सुविधांमुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. लोक स्वस्त, सुरक्षित आणि सुलभ सेवा निवडत असल्याने पारंपरिक प्रवाससेवा पुरवठादारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल.
 
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार होणार-
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लवकरच या सेवेची नियमावली आणि अटी जाहीर करण्यात येणार आहेत. विशेषतः मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक यांसारख्या मुख्य मार्गांवर असलेल्या अव्यवस्थित खासगी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. सरकारने कार सहप्रवास सेवा सुरळीत, पारदर्शक आणि नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे संकेत दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0