आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवा;काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

02 May 2025 17:43:17
 
Harshvardhan Sapkal
 (Image Source : Internet)
नागपूर :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा त्वरेने हटवावी. त्यांच्या मते, जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे सर्व समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल आणि विकास प्रक्रियेत समान संधी प्राप्त होईल.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दीर्घकाळापासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधी यांचा संघर्ष आणि दूरदृष्टी सिद्ध झाली आहे, असे सपकाळ म्हणाले.
 
त्यांनी भाजपवर टीका करत सांगितले की, मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत जनतेला दिलेल्या कोणत्याही आश्वासनावर कृती केली नाही. दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पेट्रोल-डिझेल कमी करणे आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणे यासारखी आश्वासने निवडणुकीत फुकटच्या घोषणांमध्ये बदलली आहेत. तसेच, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी ओबीसी, दलित आणि मागासवर्गीय समाजातील स्वयंसेवकांना संधी देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक आणि देशासाठी सुवर्ण दिन असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणनेच्या मागणीला मान्यता दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0