(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" (CM Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने, आता एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रित ३ हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी महिला व बालविकास खात्यातील सूत्रांनी लवकरच निर्णय घोषित होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
महिलांमध्ये नाराजी, सरकारकडून स्पष्टता अपेक्षित
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र एप्रिल महिना संपत आला तरी हप्ता जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी फेब्रुवारी व मार्चचे हप्ते एकत्रित देण्यात आले होते. त्यामुळे याही वेळी दोन्ही हप्ते एकत्र देण्यात येण्याची शक्यता आहे.
२.४७ कोटी महिलांना लाभ
जुलै २०२४ पासून सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील सुमारे २ कोटी ४७ लाख महिला लाभ घेत आहेत. आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले असून, योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे.
पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे –
अर्जदार महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो
इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. तांत्रिक कारणांमुळे हप्त्याच्या वितरणात विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.