नागपुरात ‘अक्कड-बक्कड’ स्लम चिल्ड्रन थिएटर फेस्टिवलचे रंगतदार आयोजन

02 May 2025 18:58:20
Slum Childrens Theatre Festival held in Nagpur
 
नागपूर:
मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘अक्कड-बक्कड स्लम चिल्ड्रन थिएटर फेस्टिवल’ नागपूरात मोठ्या उत्साहात पार पडला. या रंगमंचीय बालमहोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन व सेवानिवृत्त विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी अनुप कुमार म्हणाले, “नाटक हे एक सशक्त माध्यम असून, त्यातून मानवी मनातील ऊर्जा प्रभावीपणे सादर करता येते. तर ज्ञानरंजन यांनी लहान वयातच नाट्यकलेशी जुळणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत मांडले.
 
या महोत्सवात दंतेश्वरी व पांढराबोडी बस्तीच्या मुलांनी ‘अरे बाप रे’ व ‘किताबों से दोस्ती’ ही नुक्कड नाट्य सादर केली. पर्यावरण संरक्षण व वाचन संस्कृती यावर आधारित या सादरीकरणांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गोष्टरंग, पुणे यांनी सादर केलेल्या ‘मैं बिल्ली हूं’ या कथानाट्यातून लहान प्रेक्षकांनी बालसुलभ भावविश्वात रममाण होण्याचा अनुभव घेतला. तसेच ‘बुद्धिमान मेमना’ या शॅडो पपेट शोने मुलांच्या कल्पनाशक्तीला गोड स्पर्श दिला. ‘हमारी जगह’ या लघुनाटकाच्या माध्यमातून आय.टी. पार्क बस्तीच्या मुलांनी सादर केलेल्या ‘शायजा’ पात्राने प्रेक्षकांना नवीन दृष्टी दिली. फेस्टिवलमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी “अक्कड-बक्कड बँकेच्या नोटा” वापरून नाटकांची तिकीटे घेतली आणि रांगेत उभे राहून हाऊसफुल्ल शोचा अनुभव घेतला.
 
उत्सवाच्या आयोजनामध्ये म.न.पा. नागपूर, अजेय गंपावार, सूरज परमार, कामायनी मिश्रा, प्रशांत तांबे, प्रो. अंबादास मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजन टीममध्ये पुष्पक भट, निकिता ढाकुलकर, अक्षय खोब्रागडे, मयूर मानकर, स्वानंद कोट्टेवार यांचा सक्रिय सहभाग होता. आयोजकांचा मानस अशा प्रकारचे बालनाट्य महोत्सव ग्रामीण भागातही आयोजित करण्याचा आहे, ज्यातून मुलांच्या भावविश्‍वाला व्यापक व्यासपीठ मिळेल.
Powered By Sangraha 9.0