(Image Source : Internet)
मुंबई :
मागील काही महिन्यांमध्ये आकाशाला भिडलेला सोन्याचा (Gold) दर आता खाली येऊ लागला आहे. एप्रिलमध्ये १० ग्रॅमसाठी जवळपास १ लाख रुपये गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत सध्या तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या १० ग्रॅमसाठी सोने सुमारे ९२,००० रुपयांवर आले असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही सामान्य ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते.
फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही या किंमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात प्रति औंस ३५०० डॉलर्सच्या आसपास असलेले दर आता ३१४० डॉलर्स पर्यंत घसरले आहेत.
सोन्याचे दर कमी होण्याची संभाव्य कारणे:
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावात माघार
12 मे 2025 रोजी युद्धविराम जाहीर झाल्यामुळे भू-राजकीय तणाव कमी झाले आणि सोन्यावरचा दबाव हलका झाला.
अमेरिकन बाँडवर व्याजवाढ
अमेरिकेतील बाँड यील्ड 4.5% पेक्षा जास्त झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसा काढून इतर सुरक्षित पर्याय निवडले.
चीन-अमेरिका व्यापार संबंध सुधारले
टॅरिफ कपातीच्या पार्श्वभूमीवर व्यापारातील वातावरण सुधारल्याने गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळले.
नफा कमावण्यासाठी विक्री वाढली
सोन्याचे दर उच्च पातळीवर गेल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग सुरू केली.
शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण
जगभरात स्टॉक मार्केटमध्ये तेजी असून, त्यामुळे सोन्याची मागणी तुलनेने घटली आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
ऑल बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी सांगितले की, जर परिस्थिती 2013 प्रमाणे राहिली, तर सोने प्रति औंस १८२० डॉलरपर्यंत घसरू शकते. भारतात याचा परिणाम म्हणून दर १० ग्रॅमसाठी ५५,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या घडीला लघुकालीन गुंतवणूकदारांसाठी सोन्यात फारसा परतावा अपेक्षित नाही. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने नेहमीच एक स्थिर आणि सुरक्षित पर्याय राहतो.