‘ऑपरेशन सिंदूर’ मिशन संपलेले नाही, ही तर सुरूवात; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा

16 May 2025 16:15:49
 
Rajnath Singh
 (Image Source : Internet)
भुज (गुजरात) :
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शुक्रवारी भुज येथील एअरबेसवर जवानांशी संवाद साधत त्यांचं धाडस आणि शौर्याचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला की, 'ऑपरेशन सिंदूर' केवळ एक झलक होती, मूळ चित्र अजूनही सादर व्हायचं आहे. हे अभियान अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही.
 
राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय हवाई दलाची क्षमता आता संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाली आहे. शत्रूच्या सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करणं ही साधी गोष्ट नाही. आजच्या घडीला भारतीय हवाई दल कोणत्याही भौगोलिक मर्यादा न ओलांडता अचूक लक्ष्यभेदी हल्ला करण्यास सक्षम आहे.
 
"जेव्हा देशवासी निवांतपणे सकाळचा नाश्ता करत असतात, त्याच वेळेस आमचे शूर जवान शत्रूंचा खात्मा करत असतात," असं सांगत त्यांनी जवानांच्या कारवाईला सलाम केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ लष्करी कृती नव्हती, तर ती देशाच्या आत्मविश्वासाचं आणि भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचं प्रतीक होती, असंही ते म्हणाले.
 
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म पाहून लोकांना ठार मारलं, पण भारताने कोणताही भेदभाव न करता फक्त दहशतवाद्यांना त्यांच्या दुष्कृत्यांसाठी शिक्षा दिली. अशा विकृत विचारसरणी असलेल्या देशाच्या ताब्यात अण्वस्त्र सुरक्षित असू शकतात का, हा प्रश्न आता संपूर्ण जगाने विचार करायला हवा.
 
राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
Powered By Sangraha 9.0