मोदींची अटक शरद पवारांमुळे टळली; संजय राऊतांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

16 May 2025 13:40:54
 
Sharad Pawar Sanjay Raut
 (Image Source : Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नव्या पुस्तकाने आधीच चर्चेचा केंद्रबिंदू गाठला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी अनेक राजकीय घडामोडींचे नवे पैलू उघड करत खळबळ उडवून दिली आहे. हे पुस्तक शनिवारी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित होणार असले तरी, त्यातील काही भाग आधीच माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत.
 
शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळे मोदी वाचले?
राऊतांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार आणि गुजरात सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. या काळात अमित शाह यांच्यासह गुजरातमधील काही मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले होते. शाह यांना तुरुंगवास भोगावा लागला होता, आणि मोदी यांच्यावरही अटकसत्र जवळ आले होते.
 
मात्र, शरद पवारांनी ‘लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नाही’ अशी भूमिका घेतली. त्यावेळच्या केंद्र सरकारमधील त्यांच्या प्रभावामुळेच मोदींची अटक टळली, असा दावा राऊत करतात. "मोदींनी त्या उपकाराची जाणीव ठेवली का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
अमित शाह प्रकरण आणि पवारांचा फोन कॉल –
अमित शाह यांना एका खून प्रकरणात अटक झाली होती आणि त्यांना जामीन मिळावा यासाठी मोदींनी शरद पवारांशी थेट संपर्क साधल्याचा उल्लेखही पुस्तकात आहे. राऊत सांगतात की, सीबीआयच्या पथकातील काही अधिकारी जे महाराष्ट्र केडरचे होते.शाहांच्या जामिनास विरोध करत होते. मात्र, पवारांनी स्वतः पुढाकार घेत मदतीचा हात दिला.
 
यानंतर राऊतांनी असा टोकदार सवाल उपस्थित केला आहे की, "ज्यांना एकेकाळी पवारांच्या मदतीची गरज होती, त्याच अमित शाहांनी नंतर महाराष्ट्राशी कसा व्यवहार केला?"
 
पुस्तक प्रकाशनपूर्वीच खळबळ –
संजय राऊत यांच्या या विधानांमुळे पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादंग उभा राहण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील एकेकाळचा हा अदृश्य सुसंवाद आणि त्याची आजची परिणती, हे पुस्तक प्रकाशनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0