अभिनेत्री दीपिका पादुकोणचे आई झाल्यानंतर दमदार पुनरागमन; 'स्पिरिट'साठी घेतलं तब्बल 'इतकं' मानधन!

16 May 2025 14:14:59
 
Deepika Padukone
 (Image Source : Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या मातृत्वाचा आनंद घेत असून काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती. मात्र आता ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जोरदार कमबॅक करत आहे. दीपिकाचं हे पुनरागमन थेट दक्षिणेतील सुपरस्टार प्रभाससोबत ‘स्पिरिट’ या बिग बजेट सिनेमातून होणार आहे. या सिनेमासाठी दीपिकाने घेतलेल्या मानधनामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
 
सूत्रांनुसार, दीपिकाने ‘स्पिरिट’ या सिनेमासाठी तब्बल २० कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. एवढं मोठं मानधन आतापर्यंत तिने कधीच घेतलं नव्हतं. या आकड्यामुळे दीपिका आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे. ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ यांसारखे सिनेमे देणारे संदीप रेड्डी वांगा हे सिनेमाचे दिग्दर्शक असून प्रभास-दीपिकाची ही जोडी पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
‘ओम शांती ओम’पासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या दीपिकाने ‘गोलियों की रासलीला रामलीला’, ‘पद्मावत’, ‘पठाण’, ‘जवान’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ यांसारख्या हिट सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे. सातत्याने यशस्वी सिनेमे देत असल्यामुळे दीपिकाच्या मानधनात मोठी वाढ झाली आहे.
 
आईपणाचा प्रवास आणि नव्या सुरुवातीची चाहूल-
दीपिका सध्या तिच्या कन्या ‘दुआ’ च्या संगोपनात गुंतली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, "आई होण्याचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. शारीरिक आणि मानसिक संघर्षातून गेल्यावर दुआचा जन्म झाला. आज मी तिच्यासोबत नसले तरी मन अपराधी होतं. मी हरवले असं म्हणणार नाही, पण नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे.
Powered By Sangraha 9.0