(Image Source : Internet)
बुलडाणा :
आम्ही कथा-कादंबऱ्या वाचायचं केव्हाच थांबवलं आहे. आता बालसाहित्य वाचण्याचं वयदेखील गेलंय," अशा उपरोधिक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली.
भाजपच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले असताना, पत्रकारांनी ‘नरकातला स्वर्ग’ या राऊतांच्या पुस्तकाबाबत प्रश्न विचारला. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच, “आम्ही अजून लिहिलं असतं, तर मोठा गाजावाजा झाला असता,” असं राऊत म्हणाले होते.
त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “अशा गोष्टींना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. या काल्पनिक कथा आहेत. त्या वाचण्याचा काळ आता मागे राहिला आहे.” पुढे ते म्हणाले, “संजय राऊत कोण आहेत? त्यांना किती राजकीय वजन आहे?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत फडणवीस म्हणाले की, भाजप महायुतीच्या तत्त्वावरच निवडणुका लढवणार आहे. काही अपवादात्मक ठिकाणी भिन्न भूमिका घेतली जाईल, पण ती समन्वयातून ठरेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कर्जासंबंधी प्रलंबित प्रकरणांवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आवश्यक मंजूरी देण्यात आली आहे आणि ही बाब लवकरच मार्गी लागेल.