(Image Source : Internet)
नागपूर :
संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली आहे. या पुस्तकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेले आरोप निरर्थक असून, या पुस्तकातून काहीच साध्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राऊत आणि त्यांच्या पक्षाची वैचारिक अधोगती या पुस्तकातून स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.
बावनकुळे कामठी येथे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ आयोजित तिरंगा यात्रेदरम्यान बोलत होते. त्यांनी नमूद केलं की २०१९ मध्ये भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला महागात पडला असून, आज पक्ष अस्तित्व संकटात आहे. काँग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले की, हा पक्षही दिशाहीन झाला असून, गावपातळीवरचे कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले राहिलेले नाहीत.
"‘नरकातला स्वर्ग’ नव्हे, ‘नरकातील राऊत’ असं नाव योग्य-
राऊत यांनी पुस्तकात केलेले आरोप न्यायालयाने याआधीच फेटाळले असून, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा तेच आरोप करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत पुस्तकाचं नाव बदलून ‘नरकातील राऊत’ असं ठेवायला हवं होतं, असा उपरोधही केला.
राजकीय हालचालींवर भाष्य-
बावनकुळे यांनी सांगितलं की काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढली असून, संग्राम धोपटे यांच्यासारख्या नेत्यांशी वागण्यात पक्षाने चूक केली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेते लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या नुकसानीवर तत्काळ कारवाई-
राज्यात काही भागांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं असून, मुख्यमंत्र्यांनी आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांनी तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
वाळू माफियांवर कडक कारवाई-
राज्यात वाळू माफियांचे वर्चस्व पुन्हा वाढत असल्याने सरकारने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. सीसीटीव्ही प्रणाली अधिक कार्यक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
राज्यभर तिरंगा यात्रांचा उत्सव-
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर १६ ते २० मे दरम्यान राज्यातील १५०० ठिकाणी तिरंगा यात्रांचे आयोजन केले जाणार आहे. या यात्रांमुळे जनतेचा सशस्त्र दलांवरील विश्वास आणि पाठिंबा अधोरेखित होईल, असे बावनकुळे म्हणाले.