भारतातील उत्पादन थांबवा; डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलच्या प्रमुखांना सल्ला

15 May 2025 18:06:26
 
Donald Trump
 (Image Source : Internet)
नागपूर :
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला होता. त्या वेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थीचा दावा केला होता. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारतासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत ॲपल कंपनीच्या प्रमुखांना भारतात उत्पादन वाढवू नये, असा सल्ला दिला आहे. कतारमध्ये आयोजित उद्योग परिषदेवेळी त्यांनी हा सल्ला दिल्याचे समजते.
 
ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर भारताने घेतली ठाम भूमिका-
भारत-पाकिस्तान वादात कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही, हे भारताने स्पष्ट केले होते. यानंतर ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांच्यासोबत बोलताना भारतात उत्पादन वाढवण्याऐवजी अमेरिकेतच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. “टिम भारतात खूप कारखाने उभारत आहे. मी त्याला सांगितले, मला भारतात काहीच नको,” असे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ॲपलच्या भारतातील योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
भारतातील ॲपल उत्पादन धोरणाला धक्का?
ॲपल सध्या चीनवरील अवलंबित्व कमी करत भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोनचे उत्पादन करत आहे. कंपनीचा उद्देश २०२५ अखेरीस भारतातून आयफोन अमेरिकेत निर्यात करण्याचा आहे. सध्या ॲपलचे उत्पादन युनिट अमेरिकेत नाही. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर अॅपल अमेरिकेत उत्पादन सुरू करेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
व्यापार धोरणात बदल; शुल्क सवलतीची घोषणा-
अमेरिका-चीन व्यापार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ९० दिवसांची टॅरिफ सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ट्रम्प आणि टिम कुक यांच्यात भारतात सुरू असलेल्या योजनांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी भारतात उत्पादनाची गरज नाही, असे नमूद केले. दरम्यान, अॅपलने अमेरिकेतही उत्पादन वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. कंपनीने अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा आधीच केली होती.
 
भारतामध्ये सध्या ॲपलचे उत्पादन फॉक्सकॉन, टाटा आणि पेगाट्रॉन या कंपन्यांमार्फत होते. मार्च २०२४ पर्यंतच्या वर्षभरात ॲपलने भारतात २२ अब्ज डॉलर्सच्या आयफोनची निर्मिती केली, ज्यामध्ये ६० टक्के वाढ नोंदवली गेली. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील भविष्यकालीन गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0