(Image Source : Internet)
जम्मू :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्याबाबत केलेल्या थेट वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीर दौऱ्यावर असताना त्यांनी सैनिकांशी संवाद साधताना पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचा विषय उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या नियंत्रणाखाली असावीत.
राजनाथ सिंह यांच्या मते, पाकिस्तानसारखा बेजबाबदार देश अण्वस्त्रांसारख्या घातक शस्त्रांचा वापर धमकीसाठी करत असेल, तर ही बाब जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक आहे. “आता आम्हाला त्यांच्या ब्लॅकमेलिंगची भीती राहिलेली नाही,” असे ते म्हणाले.
“भारत शांततेचा पाठीराखा, पण प्रत्युत्तर देण्यात मागे राहणार नाही”
पाकिस्तानकडून शांतता भंग होणार नाही, यावर सहमती जरी झाली असली तरी जर त्यांनी कुठलीही चूक केली, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. “पाकिस्तानकडून अण्वस्त्रांची धमकी दिली जाते, पण असा प्रश्न उपस्थित होतो की अशा अस्थिर मानसिकतेच्या देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
अतिरेक्यांना त्यांच्या कर्मानुसारच उत्तर -
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, “दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांना ठार केलं, पण भारतीय लष्कराने कोणताही भेद न करता त्यांना त्यांच्या कृतीनुसार योग्य उत्तर दिलं.”
जम्मूतील बादामी भागात लष्करी छावणीला दिलेल्या भेटीत उपराज्यपाल मनोज सिन्हा हे देखील राजनाथ सिंह यांच्यासोबत होते. त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेची आणि पाकिस्तानच्या गोळीबाराच्या भागांची पाहणी केली.
सौदी अरेबियात ठरला होता प्रतिउत्तराचा आराखडा-
सूत्रांच्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियामध्येच पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसोबत ४५ हून अधिक गुप्त बैठकांचे आयोजन केले. यामध्ये एनएसए, सीडीएस, तिन्ही सैन्यदल प्रमुख, आयबी आणि रॉचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. या सर्व हालचाली अत्यंत गोपनीयतेत पार पडल्याचे सांगितले जात आहे.