पवारसाहेबांनी हिमालयावरून उडी मारायला सांगितले, तरीही....;जितेंद्र आव्हाड यांचे विधान

    15-May-2025
Total Views |
 
Jitendra Awhad on NCP Sharad Pawar
 (Image Source : Internet)
मुंबई:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान सध्या जोरदार चर्चेत आहे. पवारसाहेबांनी हिमालयावरून उडी मारायला सांगितले, तरी मी मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.
 
शरद पवार यांनी यापूर्वी गट एकत्र आणण्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवला असल्याचे सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, पवारसाहेब नेते घडवणारी यंत्रणा आहेत. १९८० साली ६० आमदार निवडून आले होते, त्यापैकी ५८ आमदार गेले, पण पवारसाहेबांनी पुन्हा नव्या दमाचे नेतृत्व घडवले.
 
एकत्रीकरणावर संभ्रम कायम-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेवर आव्हाड यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “माझ्याशी या संदर्भात कोणीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे सध्या अशा कोणत्याही हालचाली होत आहेत, असे मला वाटत नाही,” असे ते म्हणाले. तसेच, उत्तमराव जाणकर यांनी व्यक्त केलेली भावना ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून, पक्षात विचार मांडण्याची मोकळीक सर्वांनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
जयंत पाटील यांचा पक्षबांधणीवर भर-
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु केल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनांना बुथ स्तरावर बळकट करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात प्रशासनात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
 
पक्ष दौऱ्याची तयारी व संघटनात्मक बदल-
पक्षातील वरिष्ठ नेते लवकरच राज्यभर दौरे करणार असून, स्थानिक पातळीवरील संघटना आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात येईल. नव्या पिढीच्या नेतृत्त्वाला संधी देण्यासाठी युवक व महिला आघाड्यांना बळकटी दिली जाणार आहे.
 
जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेत आवश्यकतेनुसार फेरबदल, नव्या जबाबदाऱ्या आणि नियुक्त्यांचे संकेतही दिले. पक्षात नवचैतन्य निर्माण करून, जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,असे त्यांनी स्पष्ट केले.