(Image Source : Internet)
नागपूर :
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि दिव्यांगांना अधिक मानधन मिळावं, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने नागपुरात बुधवारी जोरदार रक्तदान आंदोलन (Blood donation protest) केलं. हे आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवास्थानाबाहेर पार पडलं.
यावेळी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर निशाणा साधला. “मुख्यमंत्री जर खरे रामभक्त असतील, तर त्यांनी त्वरित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
कडूंनी इशारा दिला की, जर सरकारने याकडे दुर्लक्ष केलं, तर ३ जून रोजी अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी मोठं आंदोलन उभं केलं जाईल. पुढे त्यांनी सांगितलं की, राज्यभरातील सर्व मंत्र्यांच्या घरी आंदोलनाची योजना आखली जात आहे.
तरी देखील सरकारने पावलं उचलली नाहीत, तर ७ जूनपासून अकोल्यातील मोझरी येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केले.