देवनार डम्पिंग ग्राउंड निविदा प्रकरणावरून आशिष शेलारांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

    15-May-2025
Total Views |
 
Ashish Shelar attacks Aditya Thackeray
 (Image Source : Internet)
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचराभूमीची जागा देण्याच्या निर्णयावरून मुंबईतील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
 
शेलार म्हणाले की, "मुंबईकर हो, सावधान! देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या. देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आणि कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरुन या देवनार क्षेपणभूमीवर घिरट्या घालू लागले आहे." त्यांनी आदित्य ठाकरे यांना "युवराज" संबोधून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
 
शेलार यांनी २००८ साली शिवसेनेच्या सत्ताकाळात ४,५०० कोटींच्या निविदेचा उल्लेख करत म्हटले की, "त्यावेळी आम्ही या कंत्राटाला विरोध केला होता, या कंत्राटामध्ये अनेक उणीवा आहेत हे आम्ही दाखवले होते. पण आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांची देवनार डम्पिंग ग्राउंडची निविदा मंजूर केली. कटकमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही.
 
त्यांनी पुढे विचारले की, ज्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंच ही जागा अदानीच्या नावावर होणार नाही. धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल, अपात्र झोपडपट्टी वासीयांना ही घर मिळणार, मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का? या प्रकरणावरून मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.