अजित पवारांना जोरदार धक्का; पुण्यातील बड्या नेत्याने दिला राजीनामा

    14-May-2025
Total Views |
 
Deepak Mankar
 (Image Source : Internet)
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील गोटात मोठा भूकंप झाला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी आपल्या पदाचा अनपेक्षित राजीनामा सादर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे पाठवत पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांची माहिती दिली आहे.
राजीनाम्याच्या पत्रात मानकर यांनी सांगितले की, त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे हे पूर्णपणे बनावट आहेत. "माझ्या प्रतिमेला डाग लावण्यासाठी आणि माझ्या राजकीय प्रवासात अडथळे निर्माण करण्यासाठी नियोजित कट रचला गेला आहे," असे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी एका जमिनीच्या व्यवहारात अपहार प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
राजीनाम्याच्या पत्रात मानकर पुढे म्हणतात, “एका जुन्या जमिनीच्या व्यवहारात शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप ठेवून माझ्यावर कारवाई करण्यात आली. पण या प्रकरणात दोष सिद्ध झालेला नाही. महानगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच हे पाऊल उचलण्यात आले.”
त्यांनी यावर अधिक भाष्य करताना सांगितले की, “हा व्यवहार माझ्या खाजगी मालमत्तेचा असून, मी कोणतीही गैरव्यवहार केलेली नाही. तरीही माझ्याविरोधात खोटे आरोप करण्यात आले आणि त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात आहे.”
कुकडे प्रकरणाचीही नोंद-
दीपक मानकर यांचं नाव शंतनू कुकडे यांच्याशी संबंधित बलात्कार प्रकरणातही आले आहे. पोलिस तपासात मानकर आणि कुकडे यांच्यात १ कोटी रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी मानकर यांची चौकशी केली असता, त्यांनी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
राजीनामा देताना मानकर म्हणाले, या प्रकरणामुळे पक्षाची आणि माझीही नाहक बदनामी होत आहे. पक्षश्रेष्ठींवरही याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे मी पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देतो आहे. कृपया तो स्वीकारावा.