राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर केवळ माध्यमांतच चर्चा सुरू; अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण

14 May 2025 19:09:02
 
Anil Deshmukh
 (Image Source : Internet)
नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यासंबंधीच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण केला असतानाच, पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या चर्चांवर प्रकाश टाकत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, गटविलीनीकरणाबाबत पक्षपातळीवर कुठलाही निर्णय किंवा चर्चा अद्याप झालेली नाही, ही संपूर्ण चर्चा फक्त माध्यमांपुरती मर्यादित आहे.
 
अलीकडेच शरद पवार यांनी दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत “त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही” असे विधान केल्यामुळे अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले की, अशा कोणत्याही प्रकारच्या एकत्रीकरणाविषयी पक्षात किंवा कार्यकारिणीमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही.
 
आजीत पवार यांच्या गटाकडून देखील शरद पवार गटावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर उत्तर देताना देशमुख म्हणाले की, एकत्रीकरणाच्या बातम्या या केवळ माध्यमांमधून समोर येत आहेत, प्रत्यक्षात राजकीय स्तरावर अशा कोणत्याही हालचाली नाहीत.
 
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाबाबत विचारले असता, अनिल देशमुख यांनी ठामपणे सांगितले की, त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. त्या एक जबाबदार व अनुभवी नेत्या असून त्यांच्या नेतृत्वावर कोणतीही शंका नाही.
 
एकंदरीत, एनसीपीच्या दोन गटांच्या विलयीकरणासंदर्भातील चर्चा सध्या माध्यमांपुरतीच असून, पक्षीय पातळीवर त्याबाबत कुठलाही विचार सुरू नसल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0