दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा सरासरी निकाल ९४.१० टक्के, यंदाही मुलीच अव्वल!

13 May 2025 12:34:38
 
tenth results announced
 (Image Source : Internet)
नागपूर :
राज्यभरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा सरासरी निकाल ९४.१० टक्के लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला.
 
यंदाही निकालात कोकण विभागाने आघाडीचे स्थान राखले असून, या विभागाचा निकाल ९८.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोल्हापूर आणि पुणे विभागांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या बाजूला नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी, म्हणजेच ९०.७८ टक्के इतका लागला आहे.
 
संपूर्ण राज्यात मुलींनी मुलांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. मुलींची निकालाची टक्केवारी ९६.१४%, तर मुलांची टक्केवारी ९२.३१% इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे यंदाही मुलींनी शैक्षणिक घोडदौडीत आघाडी कायम राखली आहे.
 
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल किंचित घसरलेला असून, १.७१ टक्क्यांची घट नोंदली गेली आहे. तरीही अनेक विभागांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, निकाल समाधानकारक असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून पाहता येणार आहे. निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आता तयारीला सुरूवात झाली आहे.
Powered By Sangraha 9.0