(Image Source : Internet)
मुंबई :
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. सर्वच पक्ष मुंबई महापालिकेवरील (BMC) नियंत्रण मिळवण्यासाठी रणनीती आखत आहेत. अशा वेळी ठाकरे गटासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबाशी निकटचा संबंध असलेल्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा दिला आहे.
राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातुन नेत्यांची घसरण सुरुच आहे. आता तेजस्वी घोसाळकर यांनीही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी असल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे.
तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून, अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या झाली होती. या धक्कादायक घटनेनंतर घोसाळकर कुटुंब चर्चेत आले होते. तेजस्वी या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून देखील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी व्हॉट्सअपद्वारे आपला राजीनामा विभागप्रमुखांकडे पाठवला असून, त्यात वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, पक्षातील काही वरिष्ठ नेते त्यांना पुन्हा गटात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही महिन्यांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. 'लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद' असा धमकीचा मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आला होता.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी बीएमसी निवडणुकीआधीचा हा आणखी एक मोठा झटका ठरतोय, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.