(Image Source : Internet)
बुलढाणा :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अभिनेत्री राखी सावंतवर तीव्र टीका करत देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना देशातून हाकलून देण्याची मागणी केली आहे.
गायकवाड म्हणाले, “कोणतीही व्यक्ती जर भारतात राहून पाकिस्तानचा जयघोष करत असेल, तर ती देशभक्त कशी म्हणवणार? ही देशद्रोहाची स्पष्ट लक्षणं आहेत. राखी सावंतसारख्या लोकांनी जर पाकिस्तानचा पाठिंबा दिला असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. अशा व्यक्तींना भारतात राहण्याचा अधिकार नाही.”
पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात बोलताना गायकवाड म्हणाले, “POKचा कायमचा बंदोबस्त होणे अत्यंत गरजेचे आहे. तो भारतात समाविष्ट झाला तर दहशतवाद संपवणे सोपे जाईल. बलुचिस्तानमधील परिस्थितीतही भारताने सक्रीय सहभाग घ्यावा आणि आपला दबदबा निर्माण करावा.”
बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करत गायकवाड म्हणाले, बाळासाहेब असते तर त्यांनी आधीच कठोर पावले उचलली असती. पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्यासाठी सरकारने निर्णायक पावले उचलावीत.
राखी सावंतने नेमकं काय केलं?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी सावंत ‘जय पाकिस्तान’ म्हणताना दिसत असल्याचा दावा आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, तिचं नागरिकत्व रद्द करण्याचीही मागणी सोशल मीडियावर होत आहे.