शोपियानमध्ये मोठी कारवाई;पहलगाम हल्ल्याशी संबंधित दहशतवादी शाहिद कुट्टेसह तिघे ठार

    13-May-2025
Total Views |
 
Shopian Three killed
 (Image Source : Internet)
शोपियान:
जम्मू-काश्मीरमधील शोपियान (Shopian) जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या ठार झालेल्यांमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला शाहिद अहमद कुट्टे याचाही समावेश आहे.
 
शाहिद कुट्टे हा ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी संघटनेचा एक प्रभावशाली कमांडर होता. तो गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांकडून मिळत आहे. त्याचे शोपियानमधील छोटीपोरा येथील घरही सुरक्षादलांनी कारवाईत उद्ध्वस्त केले.
 
मंगळवारी सकाळी कुलगाम परिसरात सुरू झालेल्या चकमकीनंतर काही दहशतवाद्यांनी शोपियानकडे पळ काढला. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना शोपियानमध्ये वेढले. या वेढ्यानंतर झालेल्या गोळीबारात तीनही दहशतवादी ठार झाले.
 
शाहिद कुट्टेची भूमिका काय होती?
कुट्टेने लष्कर-ए-तैयबाच्या वतीने युवकांची भरती, शस्त्र प्रशिक्षण व कारवायांचे नियोजन करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता. सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, तो अनेक स्थानिक तरुणांना दहशतवादी गटात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत असे.