(Image Source : Internet)
नागपूर:
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा निर्णय देशहितासाठी नव्हे तर निव्वळ राजकीय स्वार्थासाठी घेतला गेला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, डीजीएमओ पातळीवरील बैठक फक्त औपचारिकतेपुरती मर्यादित होती. अशा प्रकारच्या बैठका केवळ दाखवण्यासाठीच घेतल्या जातात, प्रत्यक्षात त्यातून काहीही ठोस निष्पन्न होत नाही. सरकारने आधी मिळवलेले यश आता गमावले आहे. "दोन पावले पुढे, दोन पावले मागे" हा प्रकार जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासारखा आहे, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दबावाखाली झुकत आहेत. ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीत मोदी शांत राहिले, आणि युद्धविरामानंतर ट्रम्पने श्रेय घेतले, याचा अर्थ भारतावर परकीय दबाव आहे. ही गोष्ट सरकारच्या दुर्बलतेचं चिन्ह आहे.”
वडेट्टीवार यांनी अधिक पुढे जाऊन म्हटले की, भारताने स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानविरोधात अनेकदा यश संपादन केले आहे. मात्र, सध्याचं सरकार मागे हटल्याने देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. हे राष्ट्रासाठी अपमानास्पद आहे आणि फक्त राजकीय फायदा साधण्यासाठीच केले गेले आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे.