(Image Source : Internet)
नागपूर :
कोराडीमधील संघदीप बुद्ध विहारात बुद्धपौर्णिमा (Buddha Purnima) निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भगवान गौतम बुद्धांना सादर वंदन करून शांती, दया आणि विवेक या त्यांच्या शिकवणीचा गौरव केला. कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला.
या कार्यक्रमात संघदीप बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष विनोद रंगारी, सचिव राजेश बारमाटे, सुगत वाचनालयाचे प्रमुख पन्नालाल रंगारी, सचिव विजय वाघमारे, कोराडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र धनोले यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत
मंत्री बावनकुळे म्हणाले, “भगवान बुद्धांनी दिलेला शांती आणि आत्मज्ञानाचा मार्ग आजही समाजाला दिशा देतो. यशासाठी चिकाटी, परिश्रम आणि योग्य शिक्षण यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.” त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक विकासासाठी सरकारचा सक्रिय पाठिंबा-
कोराडी परिसरात होत असलेल्या शिक्षणविषयक आणि सामाजिक उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं आणि राज्य सरकारकडून अशा कार्यांना पुढेही मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं.या बुद्धपौर्णिमा सोहळ्याने धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक प्रेरणेला एकत्र आणत समाजात नवा उजाळा दिला, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.