नागपूरमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

    09-Apr-2025
Total Views |
 
Massive fire
 (Image Source : Internet)
नागपूर (पाचपावली) :
शहरातील पाचपावली परिसरात आज, 9 एप्रिलला दुपारच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. मेहंदीबाग परिसरात असलेल्या प्रसिद्ध ‘बाबू भाई फटाका सेंटर’ या दुकानात अचानक आग लागली. आगीचा जोर इतका मोठा होता की काहीच वेळात संपूर्ण दुकान भस्मसात झाले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. नुकतेच दुकानात दोन ट्रकमध्ये नव्या फटाक्यांचा साठा आला होता, ज्यामुळे आग अधिक भडकली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या तात्काळ दाखल झाल्या, मात्र फटाक्यांच्या सतत होणाऱ्या स्फोटांमुळे आग आटोक्यात आणणे अवघड गेले.
 
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं. नागरिक घराबाहेर आले आणि काही काळ परिसर रिकामा करण्यात आला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
 
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असून, अग्निशमन विभाग आणि पाचपावली पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.