मनसे नेत्याला धमकीचा कॉल; मराठी-अमराठी वाद चिघळला

09 Apr 2025 14:36:07

MNS leader(Image Source : Internet) 
मुंबई :
मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळलेला असताना, मनसेच्या (MNS) एका वरिष्ठ नेत्याला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई शहर अध्यक्ष आणि मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांना मंगळवारी रात्री एक धमकीचा फोन आला असून, त्यांनी याबाबत थेट दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
सध्या राज्यात मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसे आक्रमक पवित्र्यात दिसत असून, याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय संघटनांवर निशाणा साधला होता. त्यांनी वक्तव्य केलं होतं की, आम्हाला कोण मुंबईत राहायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे.यानंतर काही हिंदी भाषिक संघटनांनी मनसेवर आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सगळ्या वातावरणात संदीप देशपांडे यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने अश्लील भाषा वापरत, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल केला असून, कॉल ट्रेस करून आरोपीचा शोध घेतला जात आहे. संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले, या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही.
 
मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू. दरम्यान, मुंबईत हिंदी भाषिकांवर होणाऱ्या कथित अन्यायावरून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचला आहे. काही हिंदी भाषिक खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला असून, मनसेच्या नोंदणीवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केवळ धमकीपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठं षड्यंत्र आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Powered By Sangraha 9.0