क्रिकेटमधून राजकारणात मोठी उडी; 'या' क्रिकेटपटूचा भाजपमध्ये प्रवेश

09 Apr 2025 11:37:19
 
Kedar Jadhav
 (Image Source : Internet)
मुंबई:
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
 
केदार जाधवच्या या अनपेक्षित राजकीय इनिंगचे भाजपकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भाजपात अनेक नविन चेहरे दाखल झाले, मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते केदार जाधवच्या प्रवेशाने.
 
आपल्या अष्टपैलू खेळाने आणि दमदार फिनिशिंग शैलीने क्रिकेटविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या केदारने आता राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले आहे. 39 वर्षीय केदार जाधवने 2023 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 मध्ये न्यूझिलंडविरुद्ध खेळला होता.
 
एकदिवसीय सामन्यांत 73 मॅचेस खेळून 1389 धावा, दोन शतकं, सहा अर्धशतकं आणि 27 विकेट्स घेणाऱ्या केदारचं T20 मधील योगदान मात्र मर्यादित राहिले. तरीही त्याच्या मैदानावरील परफॉर्मन्सने तो कायमच चर्चेत राहिला.
 
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केदार जाधवला नेमकी कोणती जबाबदारी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचे पक्षात स्वागत करत, केदारचा क्रिकेटमधील अनुभव, समाजाशी असलेले नातं आणि त्याची ओळख भाजपच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.राजकीय डावात आता केदार जाधव कशी फलंदाजी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
.
Powered By Sangraha 9.0