(Image Source : Internet)
विशाखापट्टणम :
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या ताफ्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल ३० विद्यार्थ्यांना जेईई मेन्स २०२५ ही महत्त्वाची परीक्षा द्यायची संधी गमवावी लागली. परिणामी, या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावत विद्यार्थ्यांच्या उशिराला ताफ्याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ताफा विशाखापट्टणममधून जात असताना वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे आम्ही परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकलो नाही. आयओएन डिजिटल झोन या केंद्रावर सकाळी ८.३० वाजता परीक्षा सुरू होणार होती. एका विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, सकाळी ७.५० वाजता आम्ही एनएडी जंक्शनवर होतो, पण परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचायला ४२ मिनिटे लागली. माझ्या मुलीला फक्त दोन मिनिटांचा उशीर झाला आणि आत जाण्यास नकार देण्यात आला.
परीक्षा केंद्र प्रशासनाने जर काही मिनिटांची सवलत दिली असती, तर या विद्यार्थ्यांचे नुकसान टळले असते, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, विशाखापट्टणम पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पष्टीकरण दिले की, ताफा ८.४१ वाजता गेला आणि परीक्षा केंद्रात पोहोचण्याची अंतिम वेळ ८.३० होती. त्यामुळे ताफ्यामुळे उशीर झाल्याचा दावा तथ्यहीन आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात निर्माण झालेल्या या गोंधळामुळे शिक्षण व्यवस्थेतील नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.