एटीएममधून पैसे काढणे महागणार; RBI चा नवा निर्णय ग्राहकांच्या खिशावर भार

08 Apr 2025 17:02:49
 
ATMs will become expensive RBI
 (Image Source : Internet)
मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता एटीएममधून मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हा नवा नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहे.
 
वाढलेले व्यवहार शुल्क -
नवीन नियमांनुसार, मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यावर ग्राहकांकडून प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपयांऐवजी २३ रुपये शुल्क आकारता येणार आहे. म्हणजेच, आता एटीएम वापरणं अधिक महाग ठरणार आहे.
 
RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार:
-ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएमवरून दरमहा ५ मोफत व्यवहार करता येतात.
-मेट्रो शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएमवर ३ मोफत व्यवहार, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ मोफत व्यवहार करता येतात.
-ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये आकारले जातील.
 
इंटरचेंज फी देखील वाढली -
ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्कासोबतच, बँकांमध्ये परस्पर व्यवहारासाठी लागणारी इंटरचेंज फी देखील वाढवण्यात आली आहे
- आर्थिक व्यवहारासाठीची इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपये करण्यात आली आहे.
-नॉन-फायनान्शियल व्यवहारांवर देखील आता ६ रुपये शुल्क आकारले जाईल. यामध्ये बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट इत्यादी व्यवहारांचा समावेश होतो.
 
शुल्कवाढीमागचं कारण काय?
हा निर्णय व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर आणि बँकांच्या मागणीवरून घेण्यात आला आहे. एटीएमच्या देखभालीचा खर्च वाढत असल्याने आणि व्यवहारांची संख्या घटत असल्यामुळे ही वाढ आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
 
ग्रामीण आणि लहान बँकांच्या ग्राहकांवर परिणाम-
या शुल्कवाढीचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील आणि लहान बँकांच्या ग्राहकांवर होणार आहे, कारण त्यांना इतर बँकांच्या एटीएमवर अधिक अवलंबून राहावे लागते. जरी डिजिटल व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असला, तरी बँकिंग सेवा अजूनही अनेकांसाठी एटीएमद्वारेच सुलभ आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात वाढ करणारा ठरू शकतो.
Powered By Sangraha 9.0