दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण; डॉ.सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

07 Apr 2025 20:34:17
 
Dr Sushrut Ghaisas
 (Image Source : Internet)
पुणे :
राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा निर्णय समोर आला आहे. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.
 
गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाइकांनी वेळेवर उपचार न दिल्याचा गंभीर आरोप रुग्णालयावर केला होता. या घटनेनंतर राज्यात संतापाचे वातावरण पसरले होते. प्राथमिक चौकशीत रुग्णालयाकडून दुर्लक्ष झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. यासंदर्भात राज्य शासनाच्या समितीने सादर केलेल्या अहवालात रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
 
नेमकं प्रकरण काय ?
पीडित महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने तिला उपचारापूर्वी १० लाख रुपयांची आगाऊ रक्कम भरण्याची अट घातली, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तातडीने अडीच लाख रुपये जमा करण्याची तयारी दाखवूनही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही, असा दावा करण्यात येतो. उपचार सुरू होण्यात झालेल्या विलंबामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला असून, यात रुग्णालय प्रशासनाची स्पष्ट निष्काळजीपणा अधोरेखित करण्यात आली आहे. आणखी दोन समित्यांचे अहवाल अपेक्षित असून, यापुढील काळात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर डॉ. घैसास यांचा राजीनामा ही एक मोठी घडामोड मानली जात असून, या प्रकरणाच्या तपासात आता अधिक गती येण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0