कर्जमाफीतून साखरपुडे व लग्नं...;कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

05 Apr 2025 20:53:16
 
Manikrao Kokate
 (Image Source : Internet)
नाशिक :
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे ते शेतकऱ्यांच्या रोषाचा विषय ठरले आहेत.
 
नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी एका शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत थेट प्रश्न विचारला असता, कोकाटेंनी उत्तर देताना सांगितले की, “शेतकरी कर्ज घेतात, कर्जमाफीची वाट बघतात आणि मग त्या पैशांतून साखरपुडे, लग्नं करतात. शेतीसाठी काहीच गुंतवणूक करत नाहीत.
 
या विधानानंतर राज्यभरातील शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून, त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी केली जात आहे.
 
राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करणारं आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की, सरकारला शेतकऱ्यांची देणंघेणं नाही.
 
शेतकऱ्यांनीही कोकाटेंना थेट आव्हान दिलं असून,आम्ही अनुदानाच्या पैशातून लग्न करतो की कर्ज काढतो, ते स्वतः येऊन पाहा,असे म्हणत कोकाटेंच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे.
 
कोकाटेंचं हे पहिलंच वादग्रस्त विधान नाही. याआधीही त्यांनी "हल्ली भिकारीही १ रुपया घेत नाही" असे वक्तव्य केल्याने वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं शेतकरी आणि विरोधक संतप्त झाले असून, सरकारला देखील अडचणीत आणले आहे.
Powered By Sangraha 9.0