ठाकरे गटात असंतोषाचे वादळ; खैरेंच्या नाराजीवर शिंदे गटाची नजर, शिवसेनेत येण्याची दिली ऑफर!

05 Apr 2025 10:40:18
 
Shiv Sena UBT
 (Image Source : Internet)
संभाजीनगर :
शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील दोन महत्त्वाच्या नेत्यांमधील संघर्ष उघड झाला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद आता सार्वजनिक झाल्याने पक्षात अंतर्गत मतभेदाचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.
 
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी खैरेंना थेट पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "खैरे साहेब आमच्या पक्षात आले, तर त्यांचं मनःपूर्वक स्वागत केलं जाईल," असं सांगत शिरसाटांनी अंबादास दानवेंवर एककल्ली कारभाराचा आरोप करत थेट टिकास्त्र सोडलं.
 
चंद्रकांत खैरे यांनी मात्र शिरसाटांच्या या आमंत्रणाला रोखठोक उत्तर दिलं. मी बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आहे, शिंदेगटात जायला मूर्ख नाही, असे खैरेंनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याने त्यांची नाराजी अधोरेखित झाली असली, तरी पक्षांतराचे शक्यता सध्या दूर असल्याचे संकेत मिळतात.
 
एकेकाळी एकमेकांचे विरोधक असलेले शिरसाट आणि खैरे आता एका सुरात बोलू लागले आहेत, यामुळे खूप काही बदलत असल्याचे जाणवते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खैरेंच्या नाराजीचा शिंदेगट राजकीय डाव म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.
 
ठाकरे गटातील अंतर्गत कलह शिंदेगटासाठी संधी ठरते का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0