गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाचा भडका; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी

    04-Apr-2025
Total Views |

Dinanath Mangeshkar Hospital
(Image Source : Internet)
पुणे :
शहरातील नामांकित नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील (Dinanath Mangeshkar Hospital) निष्काळजीपणामुळे आणि अवाजवी डिपॉझिटच्या मागणीमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर संबंधित रुग्णालयाविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
मृत महिलेच्या नातेवाईकांच्या आरोपानुसार, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घातली होती. यासंबंधीची रक्कम भरल्याचा पुरावा म्हणून रीसीटही समोर आली आहे. या व्यवहारामुळे वेळेवर उपचार न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
 
घटनेनंतर रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. संबंधित नर्स आणि डॉक्टरांचे जबाबही नोंदवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजासाठी नवे नियम तयार करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
 
या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाने रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी अधिकारी संवादासाठी आल्यावर त्यांच्यावर चिल्लर फेकून निषेध नोंदवला. जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,”अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.
 
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर दिलेली माहिती अपुरी व दिशाभूल करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मृत महिलेला वेळेवर उपचार मिळाले असते, तर तिचा जीव वाचू शकला असता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.