(Image Source : Internet)
मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा फूट पडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा मोठा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे.
वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यांच्यापैकी अनेक जण नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून बावनकुळे यांनी दावा केला की, ठाकरेंच्या पक्षातील अनेक खासदारांनी आम्हाला फोन केला आहे.
फक्त बावनकुळेच नाही, तर श्रीकांत शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे नमूद करत, आपण अजूनही मित्र होऊ शकतो, असे गूढ विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षातील नेते संपर्कात असल्याचे सांगितल्याने, राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.