अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील दोन बालविवाह टळले

    30-Apr-2025
Total Views |
- काटोलसह कन्हानमध्ये तातडीची कारवाई

child marriages(Image Source : Internet) 
नागपूर :
अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) अगोदर नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह होण्याच्या तयारीत होते. मात्र, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करत हे दोन्ही विवाह थांबवले आणि संबंधित मुलींना बालगृहात हलवून संरक्षण दिले.
 
डोंगरगावमधील १५ वर्षांची मुलगी लग्नाच्या तयारीत होती. हळदीचा कार्यक्रम पार पडला होता, पाहुणे जमले होते आणि जेवणाची व्यवस्था देखील पूर्ण झाली होती. अशा वेळी चाईल्ड लाईनमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बाल संरक्षण अधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्वरित हस्तक्षेप केला. मुलीची कागदपत्रे तपासल्यानंतर तिचे वय अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. काही विरोध असूनही पोलिसांच्या मदतीने मुलीला ताब्यात घेऊन बालगृहात पाठवण्यात आले.
 
दुसऱ्या घटनेत कन्हान भागातील १७ वर्षांच्या मुलीचा विवाह होणार होता. येथेही बाल संरक्षण पथकाने तत्काळ धाव घेतली आणि विवाह रोखण्यात यश मिळवले.
 
या दोन्ही घटनांमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजित कुर्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण आणि त्यांच्या टीमने प्रभावी भूमिका बजावली.
 
विशेष म्हणजे, या विवाहांना सहाय्य करणाऱ्या मंडप सजावटीच्या व्यक्तींना, आचार्यांना आणि डीजे चालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पुढे अशा कोणत्याही विवाहात सहभाग घेण्याआधी वधूचे वय कायद्यानुसार आहे की नाही, याची खात्री करणे बंधनकारक असेल, अन्यथा एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 
या कारवाईमुळे बालविवाह रोखण्यासाठी केवळ जनजागृती नव्हे, तर कडक कायद्यांची अंमलबजावणी देखील किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.