(Image Source : Internet)
नाशिक :
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत सत्ताधारी महायुतीमध्ये सुरू असलेला पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत असल्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नाशिकमध्ये होणाऱ्या अधिकृत झेंडावंदन सोहळ्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची निवड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, याच पदासाठी इच्छुक असलेले दादा भुसे यांना अमरावतीत ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या दाव्यावर अप्रत्यक्षपणे पडदा टाकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थतेचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता
या वादाचा गुंता इतका वाढला आहे की तो थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत गेला आहे. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. महाराष्ट्रदिनी कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार, याची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
महाजनांची उपस्थिती म्हणजे संकेत?
गिरीश महाजन यांना नाशिक जिल्ह्यात झेंडावंदनासाठी पाचारण केल्यामुळे, त्यांच्याकडेच पालकमंत्रिपद सुपूर्द होणार, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेली शिंदेसेना आणि त्यांचे प्रतिनिधी दादा भुसे नाराज होण्याची शक्यता आहे.