देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; यशस्वी कारकीर्दीला मिळाले नवीन शिखर!

30 Apr 2025 15:39:53
 
Deven Bharti
 (Image Source : Internet)
मुंबई :
कठोर निर्णयक्षमता, दीर्घ अनुभव आणि दहशतवादविरोधी कारवायांतील ठसा उमटवणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी निवृत्त आयुक्त विवेक फंसाळकर यांच्याकडून आज कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत होते.
 
या पदासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती, त्यात सदानंद गोटे, संजय वर्मा, अर्चना त्यागी आणि रितेश कुमार यांचा समावेश होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक लक्षात घेता, भारती यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.
 
उल्लेखनीय कारकीर्द –
1994 च्या बॅचचे अधिकारी असलेले देवेन भारती यांनी 2014 मध्ये सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून कार्य केले. याच काळात त्यांनी महाराष्ट्र एटीएसचे नेतृत्व करत दहशतवादाविरोधात महत्त्वपूर्ण मोहीम राबवली. मात्र 2019 मध्ये सरकार बदलल्यानंतर त्यांची बदली करून त्यांना वाहतूक विभागात पाठवण्यात आले होते. पुढे त्यांची नियुक्ती महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात अप्पर पोलीस महासंचालक पदावर झाली.
 
शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर त्यांना नव्याने तयार केलेल्या विशेष पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्या पदाचे पहिले अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला. ते मुंबई पोलिस दलात सर्वाधिक काळ सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदावर कार्यरत राहिले आहेत.
 
प्रमुख तपास आणि वादग्रस्त आरोप –
देवेन भारती यांनी २६/११ च्या हल्ल्यापासून ते जेडी मर्डर केस आणि इंडियन मुजाहिदीनविरोधातील कारवायांपर्यंत अनेक उच्च-स्तरीय प्रकरणांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत काही वाद निर्माण झाले, विशेषतः भाजप नेते हैदर आझम यांच्या पत्नीवरील एफआयआर नोंदविण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप, तसेच गुन्हेगार विजय पलांडेने केलेल्या दाऊद इब्राहिमसंबंधीच्या आरोपांचीही चौकशी झाली होती. मात्र, पुराव्याअभावी सरकारने 2022 मध्ये चौकशी अहवाल फेटाळला.
Powered By Sangraha 9.0