वक्फ कायदा म्हणजे भाजपाचा खोडसाळपणा; इम्तियाज जलील यांचा सरकारवर हल्लाबोल

    03-Apr-2025
Total Views |
 
Imtiaz Jaleel
 (Image Source : Internet)
छत्रपती संभाजीनगर :
वक्फ कायद्याच्या प्रस्तावित बदलांवरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाजप सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. या कायद्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात येत असून, हे केवळ मूळ समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
हा खोडसाळपणा सहन करणार नाही-
इम्तियाज जलील म्हणाले, भाजप सरकार आपल्या संख्याबळाचा गैरवापर करून वक्फ कायद्यात बदल करत आहे. मुस्लिम समाजाच्या संस्थांमध्ये अन्य समाजाच्या लोकांना स्थान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मग शिर्डी, तिरुपती आणि शीख धर्मस्थळांच्या व्यवस्थापन समित्यांमध्ये मुस्लिमांना संधी का दिली जात नाही?” ते पुढे म्हणाले, “मुस्लिम समाजात उच्चशिक्षित आणि हुशार व्यक्ती नाहीत का? मग वक्फ बोर्डामध्ये बाहेरच्या लोकांना घेण्याची गरज का निर्माण झाली? हा एकांगी निर्णय आम्हाला मान्य नाही. वक्फ बोर्डात सुधारणा होण्याची गरज होती, मात्र त्यासाठी असा अन्यायकारक कायदा करण्याची आवश्यकता नव्हती.
 
मूळ समस्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न-
भाजप सरकारने याआधीही मुस्लिम समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर वाद निर्माण करून मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप जलील यांनी केला. ट्रिपल तलाक, हिजाब, मांसाहार यांसारख्या विषयांवर आधी वातावरण तापवले गेले. आता वक्फ कायद्याचा मुद्दा आणून समाजात दुही माजवण्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
न्यायालयात लढा देणार-
या कायद्याला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध असून, आम्ही न्यायालयात जाऊन याचा सामना करू, असा इशारा जलील यांनी दिला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाच्या पाठिशी उभे राहू आणि आवश्यक ते सर्व उपाय योजू, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
सरकारनेच गैरप्रकारांना प्रोत्साहन दिले-
वक्फ बोर्डात काही गैरप्रकार झाले असतील, तर त्याला जबाबदार कोण? सरकारी अधिकाऱ्यांनीच हे गैरव्यवहार पाठीशी घातले, मग आता संपूर्ण कायदा बदलण्याचा अट्टहास का? असा सवालही जलील यांनी उपस्थित केला. जर खरंच पारदर्शकता आणायची असेल, तर आधीच्या त्रुटी दुरुस्त करून योग्य नियमन करणे गरजेचे होते. मात्र सरकारने तो मार्ग स्वीकारण्याऐवजी वक्फ कायद्याच्या नावाखाली मुस्लिम समाजावर अन्याय करण्याचा निर्णय घेतला आहे,असे ते म्हणाले.
 
आंदोलन तीव्र करणार-
या मुद्द्यावर मुस्लिम समाज गप्प बसणार नाही, असा इशारा देत जलील यांनी सांगितले की, आम्ही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत राहू. आंदोलन आणि कायदेशीर लढाईद्वारे हा अन्याय रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. वक्फ कायद्यातील बदलांवरून एमआयएम आणि मुस्लिम समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता पुढे या प्रकरणाला काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.