(Image Source : Internet)
मुंबई:
वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदान झाल्यानंतर मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला डिवचले होते. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर देत उलट सवाल केला आहे.
देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या? देवेंद्र फडणवीस जे काही आम्हाला विचारत आहेत माझा त्यांना सवाल आहे की, ते अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार आहेत की मोहम्मद अली जिन्ना आणि नवाज शरीफ यांच्या विचारांवर चालणार आहेत? जी भाषणे लोकसभेत झाली ती जिन्नांनाही लाजवणारी होती. शिवाय बाळासाहेबांचे विचार वगैरे सांगू नका. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हाला शिकवू नका, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, जिन्नांनाही लाज वाटली असेल अशी भाषणे लोकसभेत करण्यात आली. जिन्नांनी जे केले नाही ते भाजपाचे नेते आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी करून दाखवले. ते आम्हाला हिंदूत्व सोडले असे म्हणत आहेत तर मग काल भाजपाने काय सोडले होते? जे तुम्ही करत होतात ते लांगुलचालनच होते. कारण तुम्हाला समोर निवडणूक दिसते आहे. फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना एक्सवर पोस्ट करत डिवचले होते. बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला केला होता. यावरून आता उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रतिसवाल केला आहे.