(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) मंजूर झाल्यानंतर विरोधकांमध्ये हालचालींना वेग आला आहे. बुधवारी रात्री उशिरा घेण्यात आलेल्या मतदानात २८८ विरुद्ध २३२ मतांनी हे विधेयक संमत झाले. या ऐतिहासिक मतदानाच्या वेळी काही खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चा रंगली आहे.
लोकसभेत तब्बल १४ तासांहून अधिक वेळ वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आपली भूमिका ठामपणे मांडली. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू होते. विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत त्याचे सादरीकरण होणार आहे.
ठाकरेंचा खासदार अनुपस्थित, राजकीय चर्चेला उधाण -
विधेयकाच्या मतदानाच्या वेळी शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून, हा निर्णय त्यांच्या आजारपणामुळे असल्याचे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, वक्फ बोर्डाच्या जमिनींवर होत असलेल्या व्यवहारांवर पडदा टाकण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. विरोधकांनी मतदानात भक्कम भूमिका घेतली असून, भाजपला ३०० च्या वर मतसंख्या मिळवता आली नाही.
औवेसींचा आरोप – 'मुस्लिमांच्या जमिनींवर गदा'
एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी विधेयकाच्या विरोधात बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले, हे विधेयक मदरशांना लक्ष्य करण्यासाठी आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर सरकारचा ताबा येईल. मुस्लिमांच्या जमिनींचा निर्णय आता अधिकाऱ्यांकडे जाईल, आणि बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्डाचा कारभार पाहतील.
राज्यसभेत काय होणार?
लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर आता राज्यसभेतील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधक या विधेयकाला आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. सत्ताधारी पक्षाकडून यावर अधिक जोर दिला जाण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत या विधेयकाच्या भवितव्यावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.