शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, त्यांनी अफजलखानची कबर..; नितीन गडकरींचा हिंदू संघटनेच्या दाव्याला विरोध

03 Apr 2025 14:25:13
 
Shivaji Maharaj Nitin Gadkar
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली :
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हिंदुत्वावादी संघटनेच्या दाव्याला छेद देत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या 2 इंग्रजी पुस्तकांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो.यावर गडकरींनी आपली भूमिका मांडली. शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, असं गडकरींनी स्पष्ट केलं.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र इंग्रजीत येतंय ही आनंदाची बातमी आहे. आमच्या मनात आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे, असं गडकरींनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
 
अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली तेंव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खानने वार केला तेंव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला. त्यानंतर अफजलखानची कबर सन्मानाने झाली पाहिजे, असा आदेश महाराजांनी दिला, असे गडकरी यावेळी म्हणाले.
 
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत अर्थ सर्व धर्म समभाव असा आहे. सर्व धर्माच्या सोबत समान न्याय करणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते, असं गडकरींनी सांगितलं.
 
शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने माघारी पाठवलं. त्यांनी वेळप्रसंगी मुलाला शिक्षा करायला मागे पुढे पाहिलं नाही.. नाहीतर राजकारणात आजकाल सगळे आपली मुलं, मुली आणि पत्नी यांना तिकीट मागतात, याची आठवणही गडकरींनी करुन दिली.
 
जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमाने मोठा होतो. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते. शिवाजी महाराज यांचे कार्य फक्त महाराष्ट्र पुरत मर्यादित न राहता जगभर जायला हवे, असेही गडकरी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0