नागपूरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त सिंगल यांच्याकडून स्वतः रस्त्यावर उतरून फूट पेट्रोलिंग !

    29-Apr-2025
Total Views |
 
Dr Ravindra Singal
 (Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल (Dr Ravindra Singal) यांनी रात्री ८ ते १० या वेळेत अचानक फूट पेट्रोलिंग करत विविध भागांत थेट भेटी दिल्या. त्यांच्या या कृतीने पोलीस दलात हलचल माजली असून, नागरिकांमध्ये समाधानाचा सूर उमटला आहे.
 
डॉ. सिंगल यांनी सीताबर्डी, सदर, तहसील आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेश्राम चौक, एलआयसी चौक, रेल्वे स्टेशन, ज्येष्ठ चौक, मोमीनपुरा, नाईक तलाव, खाटीक चौक व गड्डीगोदाम परिसरात पाहणी केली. त्यांनी गर्दीची ठिकाणे तपासून वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला.गड्डीगोदाम भागातील अनधिकृत वाहन पार्किंग आणि सीताबर्डीच्या व्हेरायटी चौकात अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. वाहतूक सुरळीत ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.पाचपावली हद्दीतील नंदगिरी रोडवरील हत्या प्रकरणाच्या स्थळावर त्यांनी थेट भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणींशी संवाद साधताना, एका विद्यार्थिनीने वाचनालयाची गरज व्यक्त केली. यावर त्वरित प्रतिसाद देत, डॉ. सिंगल यांनी नव्या वाचनालयाच्या उभारणीचे आदेश दिले आणि प्रगतीची माहिती स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. गुन्हेगारी रोखण्यासाठी तपास पथक, डीबी पथक आणि गुप्तचर शाखेला सतर्क राहण्याचे आदेश देताना, विशेषतः महिलांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला.डॉ. सिंगल यांनी केवळ गुन्हेगारी नियंत्रणापुरते मर्यादित न राहता, युवकांना सकारात्मक दिशेने प्रेरित करून मुख्य प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
 
या फूट पेट्रोलिंग मोहिमेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ झाली असून नागपूरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी हा उपक्रम नक्कीच परिणामकारक ठरणार आहे.