पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; यूके टूरचे शो केले तात्पुरते स्थगित

    29-Apr-2025
Total Views |
 
Salman Khan
 (Image Source : Internet)
मुंबई :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला असून, देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
 
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननेदेखील या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त करत सोशल मीडियावर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. काश्मीरमधील या दुःखद घटनेमुळे सलमानने आपल्या युके टूरमधील कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
४ आणि ५ मेचे शो पुढे ढकलले-
सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘द बॉलीवुड बिग वन शो यूके’ संदर्भात एक अधिकृत पोस्ट शेअर केली. त्यात त्याने लिहिले की,काश्मीरमध्ये नुकतीच जी दुःखद घटना घडली, ती आमच्या सर्वांच्या मनाला भिडणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर, आम्ही जड अंतःकरणाने ४ आणि ५ मे रोजी मॅनचेस्टर आणि लंडनमध्ये होणारे शो तात्पुरते स्थगित करत आहोत.
 
सलमानने पुढे लिहिले की, शोची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आमच्या चाहत्यांना आम्ही विश्वासात घेत असून, त्यांच्या समजूतदारपणाबद्दल आभारी आहोत. लवकरच या शोच्या नव्या तारखा जाहीर केल्या जातील. कोणालाही झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो."
 
सलमानच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक-
देश शोकसागरात असताना सलमान खानने हा उच्च बजेटचा कार्यक्रम पुढे ढकलून संवेदनशीलतेचं उदाहरण ठेवले आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सलमानच्या या निर्णयाचं कौतुक करत त्याला समर्थन दिले आहे.
 
सध्या सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, चाहत्यांचे लक्ष त्याच्या पुढील टप्प्यांकडे लागून आहे.