अमरावती जिल्ह्यात वाढला जलसंकटाचा धोका; पाणीपातळी झपाट्याने घसरल्याने नागरिक चिंतेत

29 Apr 2025 16:40:22
 
Water crisis
 (Image Source : Internet)
अमरावती :
मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे आणि जलप्रवाह कायम राहिल्यामुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान अशा सर्वच जलप्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा झाला होता. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम आणि ४८ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते, तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो देखील झाले होते.
 
मात्र, सध्या वाढती उष्णता आणि सतत होणाऱ्या वाष्पीकरणामुळे या प्रकल्पांतील पाण्याची पातळी चिंताजनक वेगाने घटू लागली आहे. एप्रिल २०२४ च्या अखेरीस जलसाठा जिथे ४६ टक्के होता, तो आता घसरून ४५.२४ टक्क्यांवर आला आहे. ही घसरण ऐकताना किरकोळ वाटत असली, तरी जलतज्ज्ञांच्या मते हा इशारा धोक्याचा आहे. तापमानाची हीच स्थिती कायम राहिली आणि यंदाच्या मान्सूनमध्ये उशीर झाला, तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र जलसंकट उद्भवू शकते.
 
तज्ज्ञ सांगतात की, पाण्याचे वाष्पीकरण, घरगुती वापर आणि शेतीसाठी होणारा जलवापर यामुळे जलसाठा वेगाने कमी होत आहे. परिणामी, प्रशासनाने तात्काळ आपत्कालीन जलव्यवस्थापन आराखडा तयार करून अंमलात आणावा, जेणेकरून मान्सून येईपर्यंत नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू नये.
 
खास करून दुर्गम व ग्रामीण भागांमध्ये, जिथे पर्यायी जलस्रोत नाहीत, तिथे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील दोन महिन्यांत पाऊस न झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ येऊ शकते. जलसंपदा विभागाने जलप्रकल्पांवर सतत लक्ष ठेवणे आणि पाण्याचा वापर मर्यादित करण्यासाठी कठोर उपाय तात्काळ राबवणे आवश्यक आहे.
 
त्याचप्रमाणे, जलसंवर्धन आणि जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना पाण्याचा वापर संयमाने करण्यासाठी प्रोत्साहित करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0