एसटी महामंडळावर ‘श्वेतपत्रिका’चा धडाका; परिवहन मंत्र्यांच्या आदेशामुळे प्रशासनात खळबळ!

29 Apr 2025 15:50:57

Pratap Sarnaik
(Image Source : Internet)
मुंबई :
दीर्घकाळापासून आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST Corporation) आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आर्थिक श्वेतपत्रिका तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असली, तरी कर्मचारी संघटनांनी या पावलाचे स्वागत केले आहे.
 
सोमवारी एसटी मुख्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरनाईक यांनी हे निर्देश दिले. या वेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
१० हजार कोटींचा संचित तोटा
महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. सुमारे १० हजार कोटी रुपयांचा तोटा सध्या महामंडळाच्या गळ्यात अडकलेला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, नवीन बस खरेदी, इंधन व टायरचा खर्च आणि स्थानकांचे नूतनीकरण यासाठी महामंडळाला दररोज कसरत करावी लागत आहे.
 
त्यातच वस्तू व सेवा पुरवठादारांची थकबाकी आणि प्रलंबित वेतन यामुळे आर्थिक भार अधिक वाढला आहे. अशा स्थितीत महामंडळाच्या संपूर्ण उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद उघड करणं अनिवार्य झालं आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल आणि दीर्घकालीन उपाययोजना आखता येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 
कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या निर्णयाचे कौतुक करताना म्हटले की, “श्वेतपत्रिकेची मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करत होतो. अखेर ती मान्य झाली, हे स्वागतार्ह आहे. आर्थिक दिशाहीनतेतून महामंडळाला बाहेर काढण्यासाठी हे पहिले पाऊल ठरेल.”
 
बरगेंनी सांगितले की, श्वेतपत्रिकेमुळे खात्रीलायक माहिती उपलब्ध होईल, आणि शासन तसेच कर्मचाऱ्यांना निर्णय घेणे सुलभ होईल. त्यामुळे महामंडळाला आर्थिक सुस्थितीकडे नेण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0