सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी...;पहलगाम हल्ल्यावरील 'त्या' विधानावर वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण

29 Apr 2025 14:15:39
 
Vijay Vadettiwar
 (Image Source : Internet)
मुंबई :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या एका विधानावरून मोठा गदारोळ झाला. ‘दहशतवाद्यांकडे एवढा वेळ असतो का की ते धर्म विचारून गोळ्या झाडतील?’ या त्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. या टीकेनंतर वडेट्टीवारांनी आपली बाजू मांडत सरकारवर निशाणा साधला आहे.
 
वडेट्टीवारांनी म्हटलं की, सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी माझ्या वक्तव्याचा अर्थ बदलून, तोडून-मोडून जनतेसमोर मांडत आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने भारतात धार्मिक तेढ पसरवण्यासाठी एक नियोजित कट रचला असून, हा हल्ला त्याचाच परिणाम आहे.
 
"मी हे स्पष्टपणे सांगितलं की अतिरेक्यांनी धर्म विचारून हल्ला केला होता, मात्र केवळ हेच वाक्य दाखवून माझ्या संपूर्ण बोलण्याचा विपर्यास करण्यात आला," असा आरोप त्यांनी केला. त्यांनी मागणी केली की, माध्यमांनी आणि सरकारने त्यांच्या संपूर्ण भाषणाची पार्श्वभूमी समजून घेऊन जनतेसमोर सादर करावं.
 
वडेट्टीवार पुढे म्हणाले, हा हल्ला केवळ लोकांवर नव्हे, तर देशाच्या ऐक्यावर होता. पाकिस्तानकडून अशा कारवाया केवळ भारतात अराजक माजवण्यासाठी केल्या जातात. अतिरेक्यांना कोणताही धर्म नसतो, हेच मी मुळात सांगत होतो.
 
हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करत म्हटले, जर माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो. पण या घटनेचं खापर माझ्यावर फोडून, सरकारचं अपयश लपवण्याचा प्रयत्न थांबवावा,असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0