(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एकच मागणी ऐकू येत आहे — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील दरी मिटावी अशी जनतेची आणि शिवसैनिकांचीही अपेक्षा आहे. याआधी काही वेळा अशा एकत्रीकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्या प्रत्यक्षात कधीच घडल्या नाहीत.
आता मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर टाकलेली एक पोस्ट या चर्चांना पुन्हा उधाण आणताना दिसत आहे.
या पोस्टमध्ये म्हटलं आहे:
"वेळ आली आहे एकत्र येण्याची,
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी,
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी."
या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांचा गर्दीतून अभिवादन स्वीकारतानाचा फोटोदेखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरोखरच एकत्र येणार का? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांकडून दिलेले अप्रत्यक्ष संकेत लक्षात घेता, ही पोस्ट अधिक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी दोन्ही नेते एकत्र येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.