
(Image Source : Internet)
कामठी :
नागपूर-जबलपूर (Nagpur Jabalpur) महामार्गावर कामठी हद्दीतील महात्मा फुले पुतळ्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
शाहरुख खान आणि त्याचे दोन मित्र कन्हान येथून कामठीकडे ट्रिपलसीट मोटारसायकलवर जेवणासाठी जात होते. जेवण झाल्यानंतर परत कन्हानकडे जात असताना, रात्री सुमारे ११.३० वाजता न्यू खलासी लाईनजवळ महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ मागून येणाऱ्या टिपरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये टिपरचे पुढील चाक थेट शाहरुखच्या पायावरून गेले. त्याचे दोन्ही मित्र रस्ता ओलांडून दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर मोटारसायकल टिपरच्या पुढच्या भागात अडकली आणि टिप्पर चालकाने काही अंतरापर्यंत मोटारसायकलला फरफटत नेले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी टिपर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालक वाहन सोडून पळून गेला. नागरिकांनी तत्काळ जखमींना कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शाहरुखची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढे नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर कामठी पोलिसांनी काही तासांत टिपर चालकाला अटक केली. दरम्यान, मृत शाहरुखच्या कुटुंबीयांनी आरोप केला की कामठी-जबलपूर मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम आणि एनएचएआयच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. त्यामुळे त्यांनी मेट्रो प्रकल्प आणि रोडवेज प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.