(Image Source : Internet)
नागपूर :
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेयो रुग्णालयातील (Mayo Hospital) एका डॉक्टरसोबत लूटपाटीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या डॉक्टरला दोन हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटले. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
तक्रारदार अजय डोंगरे, जे मेओ रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत, असे समजते. २ एप्रिल रोजी पहाटे चारच्या सुमारास ड्युटी संपवून घरी जात असताना भगवा घर चौकाजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना आडवले. चाकू दाखवत त्यांनी अजय डोंगरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टर अजय कोणत्याही प्रकारे जखमी न होता बचावले. त्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी त्यांच्याकडील मोबाइल फोन आणि खिशातील दोन हजार रुपये लुटून पलायन केले.
या घटनेची तक्रार डॉक्टर अजय यांनी तहसील पोलीस ठाण्यात दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुर्व राजेश बीरबल या आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी आणि लुटलेली रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आता पोलिस मंडला नावाच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.