(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यातील कोट्यवधी बहिणींसाठी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी या योजनेची घोषणा केली होती आणि अल्पावधीतच ही योजना घराघरात पोहोचली आहे.
जुलै २०२४ पासून मार्च २०२५ पर्यंत पात्र महिलांना ९ हप्त्यांमध्ये १३,५०० रुपये मिळाले आहेत. आता एप्रिल महिन्याचा अंतिम हप्ता जमा होत असून त्यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
कोणाला किती लाभ मिळणार?
या योजनेअंतर्गत ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांतर्गत वर्षाला १२,००० रुपये मिळतात, त्यांना यामध्ये अतिरिक्त ५०० रुपयांची मदत दिली जाते. सुमारे ७.७४ लाख महिलांना याचा लाभ होतो आहे. योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आता २ कोटी ४७ लाखांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये ही संख्या २ कोटी ३३ लाख होती. ही वाढ योजनेच्या यशाचे प्रतीक मानली जात आहे.
हप्ता वेळेवर देण्यासाठी विशेष योजना-
महिला व बालविकास विभागाने बँकिंग अडचणी, आधार लिंकिंग व कागदपत्रांची पडताळणी यावर काम करणाऱ्या विशेष टीमची स्थापना केली आहे. पात्र महिलांनी जर योग्य नोंदणी केली असेल, तर त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.