ओलाच्या १२१ शोरूमवर कारवाई; आरटीओने दिले बंद करण्याचे आदेश

25 Apr 2025 14:23:14
 
Ola showrooms
(Image Source : Internet) 
मुंबई :
राज्यात ओला (Ola) इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवर परिवहन विभागने कठोर कारवाई केली आहे. व्यवसाय प्रमाणपत्र (ट्रेड सर्टिफिकेट) न घेता शोरूम सुरू करणाऱ्या १२१ शोरूमवर कारवाई केली असून, ते बेकायदेशीर ठरले आहेत.
 
राज्य परिवहन विभागाच्या तपासणीत असे स्पष्ट झाले की, ओलाचे १४६ शोरूमपैकी फक्त २७ शोरूमकडे वैध ट्रेड सर्टिफिकेट होते, तर उर्वरित शोरूमने या प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय सुरू केला होता. परिणामी, आरटीओने या शोरूमना त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
या कारवाईचा भाग म्हणून, १०९ शोरूमला कारणे दाखवा नोटिस दिल्या गेल्या आहेत. त्यानंतर, ७५ शोरूम आधीच बंद करण्यात आले आहेत, आणि उर्वरित शोरूमवरही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
 
राज्यभरातील ५५ शहरांतील ओलाच्या शोरूमवर तपासणी केली गेली, आणि अनेक शोरूम प्रमाणपत्राशिवाय चालवले जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे भविष्यात सर्व्हिस सेंटर आणि विक्री केंद्रांवर देखील लक्ष ठेवले जाईल.
 
तपासणीच्या दरम्यान, ओलाच्या १९२ वाहने जप्त केली गेली आहेत. या वाहने चेसिस नंबरनुसार तपासली जात आहेत, आणि मागील आर्थिक वर्षात २३,८०२ वाहनांची विक्री बिनप्रमाणपत्र शोरूमद्वारे झाली असल्याचे उघड झाले आहे.
 
परिवहन विभागाने घेतलेल्या या कारवाईला वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक संदेश मानला जात आहे. शोरूमच्या कारवाईनंतर, आरटीओने इतर शोरूमवर देखील तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0